Exclusive
Typography

मराठी चित्रपटांमधून खानदानी मराठमोळ्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आणि अनेक चित्रपटांमध्ये सुपरस्टार दादा कोंडकेंच्या आईच्या भूमिकेमुळे अजरामर झालेल्या ज्येष्ठ चरित्र अभिनेत्री आशा पाटील यांचा 'रेडीमिक्स' हा अखेरचा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. ‘सामना’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बन्याबापू’, ‘माहेरची साडी’, अशा जवळपास दिडशेहून अधिक हिंदी मराठी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्रीची भुमिका साकारणाऱ्या आशा पाटील यांचा नुकताच स्मृतीदिन होऊन गेला. ‘सालस आणि सरळ स्वभावाच्या आशाताईंनी अनेक चित्रपटांमध्ये खानदानी मराठमोळ्या महिलेच्या व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या अस्सल बावन्नखणी अभिनयासोबतच रुबाबदार व्यक्तित्वामुळे त्या उठून दिसायच्या. या चतुरस्त्र अभिनेत्रीचा अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’, प्रशांत घैसास यांच्या ‘कृती फिल्म्स’, आणि सुनिल वसंत भोसले यांच्या ‘सोमिल क्रिएशन्स’चा जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी या चित्रपटामध्ये केलेली ही भूमिका रसिकांची दाद मिळवीत विशेष स्मरणात राहणारी असल्याचे निर्माता – दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.

‘रेडीमिक्स’मध्ये वैभव तत्त्ववादीच्या आजीची भूमिका!!

१९६० मध्ये माधव शिंदे दिग्दर्शित ‘अंतरिचा दिवा’ या चित्रपटातील भूमिकेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशा पाटील यांनी अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. मूळच्या रुकडी (ता. हातकणंगले) येथील आशाताईंनी १५० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते. तसेच ‘कामापुरता मामा’, ‘सामना’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘बन्याबापू’, 'राम राम गंगाराम’, ‘चांडाळ चौकडी’, ‘सुळावरची पोळी’, ‘मंत्र्यांची सून’, ‘आयत्या बिळावर’, ‘गावरान गंगू’, ‘उतावळा नवरा’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘माहेरची साडी’ ते ‘ह्य़दयस्पर्शी’, ‘घे भरारी’ अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी चरित्र भूमिका केल्या. दादा कोंडकेंच्या चित्रपटांमधून त्यांच्या आईच्या भूमिकेत असलेल्या आशा पाटील यांचा कणखरपणा रसिकांना विशेष भावाला आहे. दादांसोबातच त्यांनी डॉ. काशीनाथ घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, आशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कुबल, प्रिया अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले होते. ‘रेडीमिक्स’मुळे त्यांना आजच्या पिढीतील वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी या कलावंतांसोबातही काम करता आले आहे.

Asha Patil Readymix Film 01

जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मधील आशा पाटील यांच्या निवडीचे श्रेय या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे यांना जाते. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळेच या चित्रपटात प्रेक्षकांना आशाताईंचे दर्शन झाले आहे. प्रवीण वानखेडे त्यांच्याशी कायम संपर्कात होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे आशाताई कोल्हापुरात एका वृद्धाश्रमात राहत होत्या. त्यांना आपल्या घरात राहता यावे याकरिता काही मंडळी प्रयत्न करीत होती, त्यात प्रवीण वानखेडेही होते. कौटुंबिकदृष्ट्या काहीसा खडतर प्रवास करावा लागलेल्या आशाताईंना अखेरची दीड वर्षे कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहावे लागले. मणका आणि किडनीच्या त्रासाने त्रस्त असल्यामुळे इच्छा असूनही त्या चित्रपटांमध्ये काम करू शकत नव्हत्या. प्रवीणने ही गोष्ट दिग्दर्शक जालिंदर कुंभार आणि निर्माते प्रशांत घैसास, सुनील भोसले यांच्या कानावर घालून त्यांना चित्रपटात योग्य भूमिका असल्यास द्यावी, बाकी सगळी व्यवस्था मी पाहिन असे सांगितले. आशाताई पाटील आपल्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना दिसणार ही गोष्ट तसेच प्रवीण यांची तळमळ पाहून सगळ्यांनी होकार दिला आणि त्यांचे ‘रेडीमिक्स’ मध्ये असणे पक्के झाले. त्यांच्यासाठी प्रवीणने चोख व्यवस्था उभी केली. या चित्रपटात त्यांनी वैभव तत्ववादी यांच्या आजीचं काम केलं आहे. चित्रपट त्यांच्यासोबत काम करणं हे सगळ्यांसाठीच भाग्याचं होत. त्यांच्यासोबतच्या आठवणी खूप काही शिकवून गेल्या. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी म्हणजे ही एक ईश्वरी देणगी होती आणि तो अनुभव कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे यांच्यामुळे शक्य झाला. येत्या ८ फेब्रुवारी पासून हा अनुभव त्यांच्या चाहत्यांनाही चित्रपटगृहात अनुभवता येईल.

अवघ्या चित्रपटसृष्टीची ‘आई’ ‘रेडीमिक्स’द्वारे ‘आजी’ म्हणून लक्षात राहतील.

आशाताई पाटील अवघ्या मराठी चित्रपट सृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जात होत्या. ‘रेडीमिक्स’ मधील भूमिकेमुळे आजी म्हणूनही लक्षात राहतील. उत्स्फूर्त अभिनय आणि लक्ष्यवेधी संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका सहजसुंदर वाटायच्या. ज्या पद्धतीने त्या चित्रपटातील सोज्वळ आणि प्रेमळ आईची भूमिका साकारत त्याच पद्धतीने त्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही जगत होत्या.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement